भुसावळ रेल्वे यार्डातील गोडाऊनमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

ऑगस्ट 17, 2026 2:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ रेल्वे यार्डातील पोलीस ठाण्यालगत असलेल्या एका गोडाऊनमध्ये पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात संबंधित व्यक्तीने गळफास घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime death 1 jpg webp

रेल्वे यार्ड पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या गोडाऊनमध्ये मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाची अवस्था अत्यंत कुजलेली असल्याने सुरुवातीला त्याची ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या.

दरम्यान, पोलिसांनी मृतदेहाची झडती घेतली असता पॅन्टच्या खिशात एक पॉकेट आढळून आले. त्यामध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड आणि फोटो मिळून आले. आधारकार्डवरील माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव योगेश विजय वाघधरे (वय २३, रा. ठाणेगाव, ता. कारंजा, जि. वर्धा) असल्याचे समोर आले.

बेपत्ता तरुणाशी संबंध असल्याचा संशय

कागदपत्रांवरून भुसावळ पोलिसांनी कारंजा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. तेथे तपास केला असता योगेश वाघधरे याच्या बेपत्ता होण्याची नोंद असल्याचे समोर आले. मिसिंग क्रमांक ३०/२६ नुसार १८ जुलै २०२६ रोजी विजय रामचंद्र वाघधरे यांनी पोलिसांकडे खबर दिली होती.

योगेश हा १२ जुलै रोजी उज्जैन येथे जात असल्याचे सांगून घरातून निघाला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली होती. भुसावळ रेल्वे यार्डात सापडलेल्या मृतदेहाच्या खिशातील कागदपत्रे आणि कारंजा पोलिसांकडील बेपत्ता व्यक्तीची नोंद यामुळे दोन्ही घटनांचा संबंध असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, मृतदेहाची अधिकृत ओळख निश्चित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांनी संबंधित कुटुंबीयांशी संपर्क साधला असून त्यांना भुसावळ येथे बोलावण्यात आले आहे. मृत्यूचे नेमके कारण, गळफासाची परिस्थिती आणि संबंधित व्यक्ती रेल्वे यार्डातील गोडाऊनपर्यंत कशी पोहोचली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनीही या प्रकरणाची माहिती देताना मृतदेहाच्या खिशात मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now