घराच्या छतावर सोलर बसवा अन् २५ वर्षे वीजबिलाची चिंता विसरा; जाणून घ्या महावितरणची भन्नाट योजना

ऑगस्ट 15, 2026 2:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) योजनेत दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांवर अत्यल्प खर्चात एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवला जाणार आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अनुदानामुळे या योजनेतील लाभार्थी ग्राहकांना अत्यल्प हिस्सा भरावा लागणार आहे. सुमारे २५ वर्षे मोफत वीज मिळवून देणाऱ्या या योजनेचा पात्र ग्राहकांनी लाभ घ्यावा आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त वीजबिलमुक्तीचा संकल्प करावा, असे आवाहन महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.

solar

महिना १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि वीजबिलातून मुक्ती हा या योजनेचा हेतू आहे. ही योजना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना राबवण्यात येत आहे. त्यात ग्राहकांना छतावरील एक किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी ३० हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून मिळते. ‘स्मार्ट’ योजनेत या अनुदानाखेरीज राज्य सरकारकडूनही अनुदान मिळत असल्याने वीज ग्राहकांना खूप कमी हिस्सा भरून प्रकल्प बसवता येईल.

सप्टेंबर-२०२४ ते सप्टेंबर-२०२५ या कालावधीत ज्या ग्राहकांचा मासिक वीजवापर १०० युनिटपेक्षा कमी होता, असे ग्राहक या योजनेसाठी पात्र आहेत. ‘स्मार्ट’ योजनेत दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना एक किलोवॅट सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ३० हजार रुपये तर राज्य सरकारकडून १७,५०० रुपये अनुदान मिळेल. शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल, सर्वसाधारण वर्गवारीतील पात्र ग्राहकांनाही केंद्र सरकारच्या ३० हजार रुपये अनुदानाखेरीज राज्य सरकारकडून अनुदान मिळणार आहे. या गटातील सर्वसाधारण ग्राहकांना दहा हजार रुपये राज्य सरकारकडून मिळतील. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या पात्र ग्राहकांना राज्य सरकार १५ हजार रुपये अनुदान देणार आहे.

दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना केवळ २५०० रुपये, शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्वसाधारण ग्राहकांना १० हजार रुपये तर अनुसूचित जाती व जमातीतील ग्राहकांना ५ हजार रुपये हिस्सा भरायचा आहे. उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान मिळणार असल्याने ग्राहकांचा मोठा फायदा होणार आहे.

एक किलोवॅटच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीजनिर्मिती होते. त्यामुळे शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीजबिल मुक्तीची संधी मिळणार आहे. या प्रकल्पातून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ लाभ होतो.

पात्र ग्राहकांशी महावितरणकडून संपर्क करण्यात येत आहे. तथापि, योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ग्राहकांनी स्वयंस्फूर्तीने महावितरणच्या www.mahadiscom.in अथवा https://pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर अर्ज करावा किंवा महावितरणच्या संबंधित शाखा/उपविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी लाभार्थ्यांना अर्ज भरण्यास मदत करतील. या योजनेची मुदत मार्च-२०२६ पर्यंतच आहे. त्यामुळे अत्यल्प खर्चात छतावर सौर ऊर्जा संच बसवून २५ वर्षे मोफत वीज मिळवण्याच्या या संधीचा जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील पात्र ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now