जळगाव पोलिसांकडून शस्त्र गुन्हेगारांची झाडाझडती; ७ गावठी कट्टे, जिवंत काडतुसांसह शस्त्रसाठा जप्त

ऑगस्ट 13, 2026 5:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२६ । जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि बेकायदेशीर शस्त्रांच्या वापरावर आळा घालण्यासाठी ‘ऑपरेशन ३/२५’ ही विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबविली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळपासून ही कारवाई करण्यात असून यात ७ गावठी कट्टे, जिवंत काडतुसांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

kk

जळगाव जिल्ह्यात गेल्या १० वर्षांत भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल असलेल्या तसेच बेकायदेशीर अग्निशस्त्रांच्या वापराशी संबंधित गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची माहिती पोलिसांनी संकलित करून त्याचे विश्लेषण केले. या माहितीच्या आधारे संबंधित व्यक्तींची यादी तयार करण्यात आली. त्यानुसार त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी तसेच ताब्यातील वाहनांची कायदेशीर प्रक्रियेनुसार तपासणी करण्यात आली. संबंधितांनी शस्त्रे स्वतःकडे न ठेवता मित्र, नातेवाईक किंवा परिचितांकडे लपवून ठेवली आहेत का, याचीही उपलब्ध माहितीच्या आधारे आवश्यक ठिकाणी पडताळणी करण्यात आली.

आज (दि १३ ऑगस्ट) सकाळी सुमारे ६ वाजता ‘ऑपरेशन ३/२५’ला सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष पथके एकाच वेळी रवाना करण्यात आली. गेल्या १० वर्षांच्या कालावधीत शस्त्र बाळगणाऱ्या आणि शस्त्रांच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या २१४ आरोपींच्या घरांची व वास्तव्याच्या ठिकाणांची तसेच त्यांच्या ताब्यातील वाहनांची अचानक तपासणी करण्यात आली. या कारवाईत एकूण ७ आरोपींवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

७ गावठी कट्टे, ११ जिवंत राऊंडसह मुद्देमाल जप्त

पोलिसांच्या या धडक कारवाईत एकूण ७ गावठी कट्टे, ११ जिवंत राऊंड, १ चाकू, १ तलवार, २५ मोबाईल फोन आणि ३ मोटारसायकली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ७ लाख १९ हजार ६०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. भविष्यातही अशाच प्रकारच्या अचानक आणि माहितीआधारित मोहिमा राबवून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

या विशेष मोहिमेची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांच्या विशेष पथकांनी केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now