जळगाव लाईव्ह न्यूज । मृद व जलसंधारण सप्ताहानिमित्त युवकांच्या कल्पकतेतून माती व पाणी संवर्धनाचा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी राज्यस्तरीय ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्व्हेशन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टुमारो’ ही या स्पर्धेची संकल्पना आहे. युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता अ.मं. पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या स्पर्धेत १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक सहभागी होऊ शकतात. रीलचा कालावधी ३० ते ६० सेकंद असावा. रील स्वतःच्या पब्लिक इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करावी, #SaveSoilSaveWater हा अधिकृत हॅशटॅग वापरणे तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग करणे बंधनकारक आहे. प्रत्येक स्पर्धकाला जास्तीत जास्त ३ रील्स अपलोड करता येतील. रील अपलोड करण्याचा कालावधी १५ ते १९ ऑगस्ट असा आहे. रीलच्या सुरुवातीला रीलचा उद्देश, स्पर्धकाचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे.

स्पर्धेसाठी माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती, माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना तसेच ‘आजचे संवर्धन – उद्याचे सुरक्षित भविष्य’ या विषयांवर रील तयार करता येणार आहे.
स्टोरीटेलिंग, ॲक्टिंग, म्युझिक, डान्स, ॲनिमेशन, एआय क्रिएटिव्ह, कॉमेडी, शॉर्ट फिल्म, बिफोर–आफ्टर आणि ड्रोन व्हिज्युअल्स अशा नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करता येणार आहे. रीलचे परीक्षण एकूण १०० गुणांवर केले जाणार आहे. त्यामध्ये विषय व संदेशासाठी ३० गुण, कल्पकतेसाठी २५ गुण, प्रभावी सामाजिक संदेशासाठी २० गुण, सादरीकरण व टेक्निकल क्वालिटीसाठी १५ गुण आणि इन्स्टाग्राम एंगेजमेंटसाठी १० गुण देण्यात येतील.
जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार २५ हजार रुपये, द्वितीय पुरस्कार १५ हजार रुपये आणि तृतीय पुरस्कार १० हजार रुपये असे आकर्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत. विजेत्यांना ‘महाराष्ट्र युवा जलदूत’ म्हणून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल. उत्कृष्ट सहभागींना ई-सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.
माती व पाणी संवर्धनाचा संदेश युवकांच्या सर्जनशील माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी जास्तीत जास्त युवकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









