जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२६ । जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत असून याचदरम्यान, शहरातील इच्छादेवी चौक परिसरात भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ३६ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. लीलाधर मंगल पाटील (वय ३६, मूळ रा. कठोरा, ता. जळगाव, सध्या रा. चंदू अण्णानगर, जळगाव) असे या अपघातात प्राण गमावलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लीलाधर पाटील हे दररोजप्रमाणे आपल्या दुचाकीने (एमएच १९ ईसी ९०८४) एमआयडीसीतील ‘निर्मल पाईप’ कंपनीत कामावर जाण्यासाठी निघाले होते. इच्छादेवी चौकात आले असता, अचानक आलेल्या एका भरधाव कारने (एमएच १९ बीएल ७०७७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही धडक इतकी भीषण होती की धडक दिल्यानंतर कार रस्त्यावर सलग दोन वेळा पलटी झाली.

अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात कारमधील व रस्त्यावरील मिळून चार जण जखमी झाले असून, स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली व पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली.
लीलाधर पाटील यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाचा असा अचानक दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे डोळे पाणावणारा होता.
दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.











