जळगाव लाईव्ह न्यूज । मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जुलै महिन्याच्या ₹१५०० हप्त्याची राज्यातील लाखो महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. जुलै महिना संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असतानाही सरकारकडून हप्ता जमा करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कधी जमा होणार जुलै महिन्याचा हप्ता?
सूत्रांच्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या हप्त्याबाबतचा अंतिम निर्णय ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर १० ते १५ ऑगस्टदरम्यान पात्र महिलांच्या बँक खात्यावर जुलैचे १५०० रुपये जमा होऊ शकतात. जून महिन्याचा हप्ता १५ जुलै रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता.

ज्या महिला पात्र असूनही तांत्रिक अडचणींमुळे जून महिन्याचा हप्ता मिळण्यापासून वंचित राहिल्या होत्या, त्यांच्या खात्यात जुलै आणि जून असे दोन्ही मिळून ३००० रुपये एकत्र जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य शासनाकडून ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया राबवण्यात आली असून, या निकषांमध्ये न बसणाऱ्या ८० लाखांहून अधिक महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे आता यापुढील टप्प्यात सुमारे १ कोटी ७० लाख पात्र महिलांनाच या योजनेचा दरमहा १५०० रुपयांचा लाभ मिळणार आहे.
केवायसी करूनही पैसे न आलेल्या महिलांसाठी दिलासा
ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि त्या सर्व निकषांनुसार पात्रही आहेत, तरीही अद्याप त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत, अशा अनेक तक्रारी राज्य सरकारकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, अशा अर्जांची सध्या युद्धपातळीवर पुनर्रपडताळणी (Re-verification) केली जात आहे. या पडताळणीमध्ये ज्यांचे अर्ज कायदेशीर आणि योग्य आढळतील, त्या सर्व महिलांच्या खात्यात थकीत रकमेसह लाभाचे पैसे लवकरच जमा केले जातील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.










