फेसबुक पोस्टवरून मंत्री गिरीश महाजनांची बदनामी; बीडचा तरुणाला जळगाव सायबर पोलिसांकडून अटक

जुलै 20, 2026 8:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत एका मुलीचा फोटो फेसबुकवर पोस्ट करून बदनामी केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांनी बीड जिल्ह्यातील एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीने वापरलेला मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध न्यायालयात लवकरच दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.

bharat maske

सायबर पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 17/2026 नुसार, जळगाव महापालिकेचे नगरसेवक अरविंद भगवान देशमुख (वय 45, रा. जळगाव) यांनी 19 जून 2026 रोजी फिर्याद दिली होती. त्यामध्ये “भारत बालाजी म्हस्के” या नावाच्या फेसबुक खात्यावरून मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत एका मुलीचा फोटो पोस्ट करून दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती.

या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि सायबर पोलीस निरीक्षक प्रदीप वाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सायबर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत बीड जिल्ह्यातील गोवराई तालुक्यातील भारत बालाजी म्हस्के (वय 34) याला पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून सुमारे 30 हजार रुपये किमतीचा Oppo Reno 15 5G मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपीला बीएनएसएस कलम 35(3) अन्वये नोटीस बजावण्यात आली असून न्यायालयात लवकरच दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, संबंधित आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट फेसबुकच्या सहकार्याने हटविण्यात आली असून, सुमारे 6 हजार फॉलोअर्स असलेले संबंधित फेसबुक खाते कायमस्वरूपी निलंबित (Suspend) करण्यात आल्याचेही सायबर पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकातून सांगितले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now