जळगाव लाईव्ह न्यूज । भडगाव तालुक्यातील सोलर प्लांटमधून कॉपर वायर चोरी करणाऱ्या टोळीचा भडगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत पर्दाफाश करत नऊ जणांना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीतील कॉपर वायर, मोटारसायकल, मोबाईल फोन आणि चोरीसाठी वापरलेली साधने असा एकूण ५ लाख १५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलैच्या मध्यरात्री नियमित गस्तीदरम्यान संशयास्पद हालचाली करणाऱ्या काही व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत त्यांनी भडगाव रोडलगत असलेल्या सोलर प्लांटमधून कॉपर वायर चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत नऊ आरोपींना अटक केली.

आरोपींकडून सुमारे ४ हजार मीटर सोलर कॉपर वायर, लोखंडी कटर, स्क्रू ड्रायव्हर, ८ मोबाईल फोन, चोरीसाठी वापरण्यात आलेली एक मोटारसायकल तसेच इतर साहित्य असा एकूण ₹५,१५,४०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींकडून जिल्ह्यातील इतर चोरीच्या घटनांबाबतही सखोल चौकशी सुरू आहे. या तपासातून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
अटकेतील आरोपींचे नाव
या धडक कारवाईत पोलिसांनी जानकीराम भागवत मोरे (वय २२), रवि सोमा भिल (वय २२), सुका संजय भिल (वय १९), अनिल अर्जुन भिल (वय २७), शुभम सुरेश भोई (वय २३), योगेश दिगंबर भिल (वय २०), संजय नारायण सोनवणे, आदील शेख शफिक मणियार (वय ४८), आणि जितु यशोनाथ पवार (वय २०) (सर्व राहणार इंदिरा नगर, शिरसोली, ता. जि. जळगाव) या नऊ जणांना अटक केली आहे.












