लग्नानंतर अवघ्या ६ व्या दिवशी नवविवाहितेचा अपघातात जागीच मृत्यू; जळगावातील दुर्दैवी घटना

जुलै 13, 2026 6:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । लग्नाच्या आनंदावर अवघ्या सहा दिवसांतच दु:खाची काळी छाया पसरल्याची एक अत्यंत हृदयद्रावक घटना जळगाव शहरात घडलीय. विद्यापीठासमोर भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात २१ वर्षीय नवविवाहितेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी घडली. वैशाली भाऊसाहेब पाटील (रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) असं मयत विवाहितेचे नाव असून या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

vaishali patil

मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली पाटील यांचा विवाह ७ जुलै रोजी जळगावातील देवराम नगर येथे वास्तव्यास असलेले पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्यासोबत मोठ्या उत्साहात पार पडला होता. विवाहानंतर नवदांपत्य देवदर्शन करून नुकतेच घरी परतले होते.

सोमवारी वैशाली यांना माहेरी घेऊन जाण्यासाठी त्यांचे काका प्रवीण सूर्याजी पाटील जळगाव येथे आले होते. दुपारचे जेवण झाल्यानंतर दोघेही दुचाकीवरून कोळपिंप्रीकडे निघाले. दुपारी सुमारे चारच्या सुमारास विद्यापीठासमोरील रस्त्यावरून जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत वैशाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना घटनास्थळीच मृत घोषित करण्यात आले. तर प्रवीण पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच सासर आणि माहेरचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. अवघ्या सहा दिवसांपूर्वी नव्या आयुष्याची सुरुवात केलेल्या वैशाली यांच्या अकाली निधनाने दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्याही डोळ्यात अश्रू तरळले.

दरम्यान, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या चारचाकी वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now