मैत्रीला काळिमा! मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध, रावेरमधील ‘त्या’ हत्येचा पोलिसांकडून उलगडा, दोघे गजाआड

जुलै 12, 2026 10:25 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । रावेर तालुक्यातील नांदूरखेडा शिवारात दोन दिवसांपूर्वी आढळलेल्या मजुराच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंध आणि जुन्या सूडाच्या भावनेतून मजुराची त्याच्याच मित्राने साथीदाराच्या मदतीने गळा आवळून हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

crime jpg webp

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी गणेश संजय घोरपडे याचे मयताच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. काही महिन्यांपूर्वी हे दोघे ऐनपूर येथे ग्रामस्थांच्या हाती रंगेहात सापडले होते. त्या वेळी ग्रामस्थांनी गणेशला चांगलाच चोप दिला होता. या अपमानाचा आणि मारहाणीचा राग गणेशच्या मनात होता. याच वैमनस्यातून त्याने मयताला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

हाच सूड उगवण्यासाठी आरोपी गणेश घोरपडे आणि त्याचा साथीदार मेघराज सांगळे यांनी ९ जुलैच्या रात्री कट रचला. त्यांनी मयताला सोबत घेऊन दारू पाजली आणि त्यानंतर दुचाकीवरून त्याला नांदूरखेडा शिवारात नेले. तिथे मयताची नशेची अवस्था पाहून दोघांनी त्याचा गळा आवळून निर्घृण खून केला व मृतदेह शेतात फेकून फरार झाले. दोन दिवसांनंतर हा मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.

मुख्य आरोपी गणेश घोरपडे हा गुन्ह्यानंतर मध्य प्रदेशात पळून गेला होता. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने त्याचा शोध सुरू केला. पीएसआय संतोष पवार, हेड कॉन्स्टेबल सलीम तडवी, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र चौधरी आणि सचिन घुगे यांच्या पथकाने मध्य प्रदेशातील सागवानी परिसरात सापळा रचून मुख्य आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. त्याचा साथीदार मेघराज सांगळे या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now