चोपड्यात धक्कादायक प्रकार! तापवल्यानंतर दूध झाले ‘रबरासारखे’; व्हिडिओ व्हायरल

जुलै 11, 2026 12:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभर भेसळखोरांवर धाडसत्र सुरू असतानाच, जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात संशयास्पद दूध विक्रीचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका खाजगी डेअरीमधून खरेदी केलेले दूध घरी नेऊन तापवल्यानंतर ते चक्क रबरासारखे घट्ट होऊन ताणले जात असल्याचे उघडकीस आले. या विचित्र प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून, चोपडा शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

milkfakechopda

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा येथील रहिवासी आणि माजी सैनिक धनराज बाविस्कर यांनी शहरातील एका नामांकित खाजगी दूध डेअरीमधून दूध खरेदी केले होते. घरच्यांनी हे दूध नेहमीप्रमाणे तापवण्यासाठी गॅसवर ठेवले असता, काही वेळातच त्यात अत्यंत अनपेक्षित बदल दिसून आला.

दूध उकळल्यानंतर ते नेहमीप्रमाणे दाट होण्याऐवजी अत्यंत चिकट झाले. जेव्हा चमच्याने ते दूध उचलून पाहिले, तेव्हा ते एखाद्या रबराप्रमाणे लांब ताणले जात होते. दुधाला आलेला हा च्युइंगम किंवा प्लास्टिकसारखा आकार पाहून बाविस्कर कुटुंबीय चक्रावून गेले.

माजी सैनिक धनराज बाविस्कर यांनी या रबरासारख्या ताणल्या जाणाऱ्या दुधाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुले आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळून बाजारामध्ये थेट ‘सिंथेटिक’ (बनावट) किंवा घातक रसायने मिश्रित दूध विकले जात असल्याचा संशय नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

माजी सैनिकाची एफडीएकडे तक्रार; सखोल चौकशीची मागणी
या प्रकरणाची गंभीर दखल घेत माजी सैनिक धनराज बाविस्कर यांनी संबंधित खाजगी डेअरीविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) दूरध्वनीद्वारे थेट तक्रार दाखल केली आहे. संबंधित दुधाचे नमुने तातडीने जप्त करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत, तसेच या दुधात नेमकी कोणत्या रासायनिक पदार्थांची भेसळ करण्यात आली आहे, याचा सखोल शोध घेऊन दोषी डेअरी चालकावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बाविस्कर यांनी केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now