जळगाव लाईव्ह न्यूज | १० जुलै २०२६ | जळगाव शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत एमडी तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि जिल्हापेठ पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, या रॅकेटमधील एका फरार आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विक्री आणि तस्करीविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने आज १० जुलै रोजी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील शासकीय तांत्रिक विद्यालयाजवळील जी.एस. ग्राऊंड परिसरात सापळा रचला.

गुप्त माहितीच्या आधारे संशयितांना अडविण्याचा प्रयत्न केला असता मोटारसायकलवरील तीनपैकी एक आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाला. मात्र, पोलिसांनी जयेश देविदास तायडे (२७, हरी ओम नगर) आणि हितेंद्र शिवाजी परदेशी (३१, कांचन नगर) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने प्राथमिक तपासणी केली असता हा पदार्थ एमडी असल्याचे स्पष्ट झाले.
या कारवाईत पोलिसांनी २ लाख ८१ हजार ५४० रुपयांचे एमडी आणि २५ हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर (MH-19-DJ-0132) मोटारसायकल असा एकूण ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्राथमिक चौकशीत अटक आरोपींनी भैय्या सोनवणे (रा. कांचन नगर) याच्याकडून विक्रीसाठी एमडी घेतल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने फरार आरोपीचा शोध सुरू केला असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास केला जात आहे.
मुख्य आरोपीवर आधीच गंभीर गुन्हे
अटक करण्यात आलेला जयेश तायडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला, गंभीर दुखापत आणि दरोड्यासारखे गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद आहेत. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वातील सपोनि अनिल वाघ, पोउनि संतोष पवार, पोउनि दिपक जगदाळे, पोउनि जितेंद्र वल्टे, सफौ/अतुल वंजारी, सफौ/हेमराज भावसार, पोहेकॉ/अकरम शेख, पोहेका/मुरलीधर धनगर, पोहेकॉ/प्रविण भालेराव, पोहेकों/महेश महाजन, पोहेकॉ/ विजय पाटील, पोहेकॉ/किशोर पाटील, पोहेकों/छगन तायडे, पोकों/प्रदीप सपकाळे, पोकॉ/ राहुल रगडे पोकों/उदय कापडणे यांचे पथकाने उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.










