जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । जळगाव शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता असून शिवसेनेच्या महापौर जयश्री महाजन आणि विरोधी पक्ष नेते सुनील महाजन हे दोघे उद्या माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या सेनेत सुरू असलेल्या अंतर्गत कलहच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार असल्याने महत्वाची मानली जात आहे.
जळगाव शहराचे राजकारण गेल्या दोन महिन्यांपासून चांगलेच ढवळून निघाले असून दररोज काही ना काही नवीन चर्चा समोर येत असते. भाजपचे नगरसेवक गळाला लावत शिवसेनेचा भगवा मनपावर फडकला. गेल्या काही दिवसात भाजपचे नगरसेवक पुन्हा गळाला लावणे, राष्ट्रवादीत फेरबदल होणे, बीएचआरचे अटकसत्र होणे या घडामोडीनंतर पुन्हा नवीन राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. विद्यमान महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची बुधवारी भेट घेणार आहे.
गेल्या महिन्यात विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी एकनाथराव खडसे यांची भेट घेत जळगावातील राजकीय कुंडली त्यांच्यासमोर मांडली होती. आगामी राजकीय गोळाबेरीज जमण्यासाठी आणि दिग्गजांना मात देण्यासाठी आणखी काही फेरबदल होणे आवश्यक आहे. गेल्या महिन्यातील भेटीनंतर उद्या पुन्हा महाजन-खडसे भेट होणार आहे. जळगावातील शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण लागले असून अंतर्गत कलह मोठ्याप्रमाणावर पेटला आहे. शिवसेनेच्या या गटबाजीत ही भेट होणार असल्याने राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे.