‘लालपरी’ची झाली ‘जलपरी’! शहादा-जळगाव बसमध्ये प्रवाशांवर छत्री उघडण्याची वेळ; व्हिडिओ व्हायरल

जुलै 4, 2026 1:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । प्रवाशांच्या सेवेसाठी धावणारी राज्यातील ‘लालपरी’ आता प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. शहादा-जळगाव एसटी बसच्या छतातून पावसाचे पाणी थेट प्रवाशांच्या अंगावर गळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे प्रवाशांना चक्क बसमध्येच छत्र्या उघडून प्रवास करण्याची वेळ आली. या घटनेचा व्हिडिओ एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

stbus

मिळालेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात नियमितप्रमाणे शहादा-जळगाव एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. बसच्या छतातून सतत पाणी गळत असल्याने अनेक प्रवाशांचे कपडे, बॅगा आणि इतर साहित्य भिजले. अखेर पावसापासून बचाव करण्यासाठी काही प्रवाशांनी बसच्या आतच छत्र्या उघडून प्रवास केला.

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ बसमधील एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करून सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओ व्हायरल होताच एसटी महामंडळाच्या देखभाल व्यवस्थेवर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रवाशांच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, या घटनेवरून राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख रोहिणी पाटील (खडसे) यांनी सरकार आणि परिवहन विभागावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, “एसटीच्या दुरवस्थेमुळे जनतेचे अतोनात हाल होत आहेत. परिवहन मंत्र्यांनी केवळ घोषणा न करता अशाच गळणाऱ्या एसटी बसमधून स्वतः प्रवास करून पाहावा, म्हणजे सामान्य प्रवाशांच्या अडचणींची जाणीव होईल.”

या घटनेमुळे एसटी बसच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, या व्हायरल व्हिडिओनंतर एसटी महामंडळाकडून या प्रकाराबाबत काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now