जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरामधून झालेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा एमआयडीसी पोलिसांनी छडा लावत एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेली सुमारे २५ हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्रो मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जूनच्या रात्री ते ३० जूनच्या पहाटे दरम्यान सुप्रीम कॉलनी परिसरातून फिर्यादी दस्तगीर अल्लाउद्दीन पिंजारी यांच्या मालकीची MH-19 BC-4692 क्रमांकाची स्प्लेंडर प्रो मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिसांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला.
तपासादरम्यान शाहरुख खान सलीम खान (वय २६, रा. इंद्रप्रस्थ नगर, पोलीस कॉलनी, सुप्रीम कॉलनी, जळगाव) याला ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने मोटारसायकल चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेली २५ हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्रो मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, पुढील तपास पोहेकॉ. गिरीश पाटील करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बाबन आहाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.










