जळगाव लाईव्ह न्यूज । जामनेर तालुक्यातील वाकोद येथे रस्त्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान एका जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांवर पहूर पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन साहेबराव जोशी (वय ३०, रा. वाकोद, ता. जामनेर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. १ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास ते त्यांच्या घरासमोर उभे असताना कैलास आत्माराम जोशी आणि विलास आत्माराम जोशी हे मोटारसायकलवरून तेथून जात होते. यावेळी रस्त्याच्या कारणावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. वादादरम्यान आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

वादानंतर काही वेळातच दोन्ही आरोपी पुन्हा घटनास्थळी आले. त्यापैकी एकाच्या हातात लोखंडी कुऱ्हाड तर दुसऱ्याच्या हातात लोखंडी रॉड होता. दोघांनीही गजानन जोशी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत असताना गजानन यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.
दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी पुढे आलेले फिर्यादीचे काका अशोक जोशी यांनाही आरोपींनी लोखंडी रॉडने मारहाण केली. या हल्ल्यात तेही जखमी झाले.
जखमींवर उपचार करण्यात आल्यानंतर वैद्यकीय अहवाल आणि फिर्यादीच्या जबाबाच्या आधारे पहूर पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात खुनाच्या प्रयत्नासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वाकोद परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या प्रकरणाचा पुढील तपास पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी गणेश सुस्ते करीत आहेत.










