जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२६ । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत सराईत गुन्हेगाराच्या गेंदालाल मिल परिसरातून मुसक्या आवळल्या आहे. विजय वसंत अहिरे उर्फ भोमपाली (वय ३२) असं अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीचे बेकायदेशीर गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गेंदालाल मिल परिसरात विजय अहिरे हा गावठी पिस्तूल बाळगून परिसरात दहशत निर्माण करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने २ जुलै रोजी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, विजय अहिरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध जळगाव शहर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, मारहाण, दंगल आणि शस्त्र कायद्याअंतर्गत एकूण ५८ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, अक्रम शेख, विजय पाटील, किशोर पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, पोलिस कॉन्स्टेबल छगन तायडे, रविंद्र कापडे, राहुल रगडे , प्रदीप सपकाळे आदींच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.











