जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात अपघताचे प्रमाण कमी होताना दिसत नसून यातच नागपूरहून जळगावकडे येणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसचा बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा बायपास मार्गावर भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस अचानक उलटली. या अपघातात ९ प्रवासी गंभीर जखमी झाले असून इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेनंतर स्थानिक पोलीस आणि ‘ओम साई फाउंडेशन’च्या स्वयंसेवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे नागपूरहून जळगावकडे येणारी ही खाजगी ट्रॅव्हल्स बस नांदुरा बायपासवरून जात असताना अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर बस रस्त्यावरच पलटी झाली. अपघातावेळी बहुतांश प्रवासी गाढ झोपेत असल्याने बस उलटताच एकच आरडाओरडा आणि गोंधळ उडाला.

अपघाताची माहिती मिळताच नांदुरा पोलीस ठाण्याचे पंकज डाबेराव यांनी तात्काळ पावले उचलली. त्यांनी श्रीकृष्ण संदुके आणि सव्यद साहेब यांच्या माध्यमातून तातडीने ‘ओम साई फाउंडेशन’ला घटनेची कल्पना दिली. माहिती मिळताच फाउंडेशनचे स्वयंसेवक विलास निंबोळकर, पत्रकार वैभव काजळे, अश्विन फेरण आणि कृष्णा वासोकार हे दोन्ही रुग्णवाहिकांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने या टीमने बसमध्ये अडकलेल्या आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रवाशांना अत्यंत शिताफीने बाहेर काढले. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे नांदुरा शहरातील डॉ. तायडे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यातील काही प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी नागपूर आणि जळगाव येथील मोठ्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे.
अपघातातील गंभीर जखमींची नावे:
१. फिलिप जोसेफ (नागपूर)
२. प्रदीप मारचेलीवार (नागपूर)
३. शशिकांत सहारे (भंडारा)
४. विभा पाटील (नागपूर)
५. संकेत सोमानी (नागपूर)
६. सुवर्णा सोमानी (जळगाव)
७. वैभव बोदडे (वडगाव)
८. मोहम्मद सईद (नांदुरा)
९. मृणाल सुखदेव (नागपूर)
या अपघातामुळे बायपासवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. नांदुरा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.










