जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । जळगाव शहरातील एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील फातेमानगरात शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास कुसुंबा व फातेमानगरातील तरुणांमध्ये वाद झाला. यात दाेन गटात तुफान हाणामारी व दगडफेक झाली. यावेळी गोळीबार झाल्याची चर्चा देखील सुरु होती परंतु याला दुजोरा मिळू शकला नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दुचाकी अडवल्याने कुसुंबा व फातेमानगरातील तरुणांत वाद झाला. शाब्दिक वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. या वेळी तरुणांनी एकमेकांवर दगडफेक करून दुचाकींची ताेडफाेड केली. तसेच फातेमानगरातील साई प्रसाद कंपनीतदेखील ताेडफाेड करण्यात आली. या वादामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक प्रताप शिकारे, अतुल वंजारी, गाेविंदा पाटील व इतर कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी गर्दी पांगवून परिस्थती नियंत्रणात आणली. तसेच पाेलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले. तर काही संशयितांचा शाेध सुरू हाेता. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.