TATA मोटर्सनंतर, आता कियाच्या गाड्याही १ जुलैपासून महागणार

जून 19, 2026 1:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना पुढील महिन्यापासून खिशाला कात्री लावावी लागणार आहे. कारण दिग्गज वाहन उत्पादक कंपनी ‘टाटा मोटर्स’ने दरवाढीची घोषणा केल्यानंतर, आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत ‘किया इंडिया’नेही (Kia India) आपल्या सर्व गाड्यांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १ जुलै २०२६ पासून कियाच्या सर्व मॉडेल्सच्या किमतींमध्ये जास्तीत जास्त २ टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे.

kia car

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, उत्पादन खर्च, पुरवठा साखळीवरील वाढता खर्च आणि परिचालन खर्चात झालेली वाढ यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत हा अतिरिक्त आर्थिक भार कंपनीने स्वतः उचलला होता, मात्र सध्याच्या परिस्थितीत दरवाढ अपरिहार्य असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

कियाने सांगितले की, दरवाढ सर्व मॉडेल्सवर समान प्रमाणात होणार नाही. प्रत्येक मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार नवीन किंमत निश्चित केली जाईल. त्यामुळे काही गाड्यांच्या किमतीत कमी तर काहींच्या किमतीत अधिक वाढ होऊ शकते.

भारतात किया सेल्टोस, सोनेट, कॅरेन्स, सिरोस आणि कार्निव्हल यांसारख्या लोकप्रिय मॉडेल्सना मोठी मागणी आहे. त्यामुळे या दरवाढीचा परिणाम मोठ्या प्रमाणावर ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे.

कियापूर्वी भारताची आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी ‘टाटा मोटर्स’नेही आपल्या प्रवासी वाहनांच्या किमतीत १.५ टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्सची ही दरवाढ देखील १ जुलै २०२६ पासूनच लागू होणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यापासून कार खरेदी करणे अधिक खर्चिक ठरणार हे स्पष्ट आहे.

१ जुलैपूर्वी बुकिंग फायदेशीर?

जर तुम्ही कियाची नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर १ जुलैपूर्वी बुकिंग करणे फायदेशीर ठरू शकते. अनेकदा वाहन उत्पादक कंपन्या दरवाढीची अंमलबजावणी करण्यापूर्वी झालेल्या बुकिंगवर जुनेच दर लागू करतात किंवा काही सूट देतात. मात्र, हे पूर्णपणे डीलरशिप आणि कंपनीच्या नियम व अटींवर अवलंबून असेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now