पाणीबाणीची चाहूल! जळगाव जिल्ह्यातील धरणांमध्ये फक्त ‘इतका’ टक्के जलसाठा शिल्लक?

जून 19, 2026 8:47 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जून महिन्याचा अर्धा कालावधी उलटून गेला असला तरी मान्सूनने अद्याप अपेक्षित हजेरी लावलेली नाही. यामुळे बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा झपाट्याने घटत असून सध्या जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघुप्रकल्पांमधील एकूण जलसाठा केवळ ३३ टक्क्यांवर आला आहे. पावसाने लवकरच जोरदार पुनरागमन न केल्यास जिल्ह्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

hatnur dam jpg webp

गेल्या वर्षी याच काळात जिल्ह्यातील धरणांमध्ये ५२ टक्के जलसाठा उपलब्ध होता. मात्र यंदा तो तब्बल १९ टक्क्यांनी घटून ३३ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये उन्हाची तीव्रता कायम असून पावसाअभावी जलस्रोत आटण्याच्या मार्गावर आहेत.

३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी राखीव साठा

पाणीटंचाईची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गिरणा धरणातून होणारा शेतीसाठीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंचन विभागाने जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी साठा राखून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

प्रमुख धरणांतील स्थिती चिंताजनक

हतनूर धरणात सध्या केवळ २१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणात ५८ टक्के साठा उपलब्ध होता. तर गिरणा धरणात २९ टक्के जलसाठा असून मागील वर्षी हा साठा २१ टक्के होता. वाघूर धरणाची स्थिती तुलनेने समाधानकारक असून येथे ६२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

जळगावकरांच्या नजरा आकाशाकडे

जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या प्रामुख्याने हतनूर आणि गिरणा धरणांवर अवलंबून आहे. विशेषतः धुळे आणि जळगाव जिल्ह्यांसाठी जीवनदायिनी ठरणाऱ्या गिरणा नदीवरील पाणीपुरवठ्यावर याचा थेट परिणाम होऊ शकतो. आगामी काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होईल. यामुळे आता संपूर्ण जळगावकरांसह बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहे. वरुणराजा लवकरच कृपा करेल आणि धरणांतील जलसाठ्यात वाढ होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now