जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२६ । राज्यात १३ जून उजाडला तरी मान्सूनने अद्याप जोरदार हजेरी लावलेली नसल्याने जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा ‘एल निनो’च्या प्रभावाचा इशारा आधीच देण्यात आला होता आणि त्याचे परिणाम आता मान्सूनच्या संथ वाटचालीत दिसून येत आहे. दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे आणि असह्य उकाड्यामुळे जळगावकर अक्षरशः त्रस्त झाले असून सर्वांचे लक्ष पावसाकडे लागले आहे.

दरम्यान, हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यात २० जूनपर्यंत मान्सून पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे दमदार आणि समाधानकारक पावसासाठी नागरिकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. मान्सूनचे आगमन लांबल्याने खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांचीही चिंता वाढली असून आता सर्वांच्या नजरा पुढील हवामान घडामोडींवर खिळल्या आहेत.

सर्वसाधारणपणे १० जूनपर्यंत मान्सून दाखल होऊन पावसाला सुरुवात होते. मात्र, यंदा हवामान विभागाने सुरुवातीला १२ जून, त्यानंतर १५ जून आणि आता थेट २० जूननंतर पावसाची शक्यता वर्तवली आहे. पावसाचे वेळापत्रक पुढे ढकलले जात असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे
हवामान अभ्यासक काय म्हणतात?
“मान्सून कोकण किनारपट्टीवर पोहोचला असला तरी त्याला गती देणारे वारे आणि ढग अद्याप निर्माण झालेले नाहीत. जे पावसाचे ढग तयार होत आहेत, ते जमिनीकडे न सरकता समुद्रात किंवा कर्नाटक आणि केरळच्या देशाने जात आहेत. जळगावात सध्या अरबी समुद्राकडून वारे येत असले तरी ते कोकण मार्गे न येता सुरत-वापी (गुजरात) मार्गे येत आहेत. परिणामी, हवेतील बाष्पयुक्त ढग जळगाव जिल्ह्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत.”
मान्सूनचा वेग मंदावला
“एल निनोमुळे मान्सूनचा वेग, पावसाचे वितरण आणि त्याची तीव्रता यामध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मान्सूनच्या गतीसाठी वातावरणात जी अनुकूल स्थिती निर्माण व्हायला हवी होती, ती अद्याप झालेली नाही. त्यामुळे मान्सूनचा वेग मंदावला असून जळगाव जिल्ह्यात २१ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता आहे.”
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जळगावकरांना संतुलित आणि दमदार पावसासाठी २० जूननंतरच प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यानच्या काळात, पुढील काही दिवस संपूर्ण जिल्ह्यात मुख्य मान्सून नसला तरी, एखाद्या दिवशी सायंकाळच्या वेळी ठराविक तालुक्यांमध्ये केवळ वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची हजेरी लागू शकते. मात्र, मुख्य पावसासाठी जळगावकरांना आणखी काही दिवस उकाडा सहन करावा लागणार हे आता स्पष्ट झाले आहे.








