जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२६ । जून – मे व जून २०२६ दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय (दत्ता मामा) भरणे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विशेष चर्चा झालेल्या या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील आणि रावेरचे आ. अमोल जावळे यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्या ठामपणे मांडल्या.

बैठकीत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वादळी वाऱ्यामुळे बाधित झालेल्या फळपिकांचे पंचनामे तातडीने आणि काटेकोरपणे पूर्ण करण्याचे निर्देश देत शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले. नुकसानभरपाईची प्रक्रिया गतीमान करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी महसूल, कृषी विभाग आणि विमा कंपन्यांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जळगाव जिल्ह्यात २३ मे ते ६ जून २०२६ या कालावधीत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे ४१३ गावांतील १० हजार ३६९ शेतकऱ्यांचे सुमारे ७ हजार २१६ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती बैठकीत सादर करण्यात आली. यामध्ये रावेर तालुक्यातील सुमारे ३ हजार ७७१ हेक्टर, मुक्ताईनगर तालुक्यातील १ हजार ५४९ हेक्टर तर चोपडा तालुक्यातील ८८५ हेक्टर क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील केळी उत्पादकांना सर्वाधिक फटका बसल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने महत्त्वपूर्ण मुद्दे मांडताना विमा कंपनीकडून कमी क्षेत्र दाखविण्याच्या तक्रारी, पूर्वसूचना नोंदणीतील तांत्रिक अडचणी, एमआरएसएसी अहवालामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव तसेच केळी उत्पादकांना विशेष आर्थिक मदत देण्याची मागणी केली. मध्यप्रदेश शासनाप्रमाणे नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २ लाख रुपये विशेष मदत देण्याची मागणीही त्यांनी केली.
यावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सकारात्मक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून या मागणीबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच विमा कंपनीने प्रत्यक्ष पंचनामे आणि वस्तुस्थितीच्या आधारे दावे निकाली काढावेत, अपील केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करावी आणि नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण पुढील दहा दिवसांत पूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीत फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. तसेच कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव परिमल सिंग, कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी संचालक विनयकुमार आवटे, कृषी संचालक (विस्तार) रफिक नाईकवाडी, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, भारतीय कृषी विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी कृषिमंत्री भरणे यांनी “शेतकरी हा केंद्रबिंदू मानून सर्व यंत्रणांनी काम करावे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत न्याय व मदत मिळाली पाहिजे,” असे स्पष्ट निर्देश देत सर्व संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्याच्या प्रश्नांना राज्य शासनाच्या सर्वोच्च स्तरावर प्राधान्य मिळाल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.









