जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२१ । केळी पीक विम्याचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यावरून केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राज्यातील सत्ताधारी महाविकासआघाडी यांच्यात श्रेय घेण्यावरुन वाद सुरु झाला आहे. याच वादातून राज्याचे पाणी पुरवठा योजना मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्यात चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळत आहे.
या मुद्यावरून खासदार रक्षा खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टोला लगावला होता. त्यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केळी पीक योजनेच्या नुकसान भरपाईचे निकष बदल करण्याचे श्रेय मी घेत नाही. मात्र मंत्री गुलाबराव पाटील हे मला वडिलांसारखे आहेत. त्यामुळे याप्रकरणी त्यांनी माझ्यावर टीका न करता मुलीने चांगले काम केले म्हणून प्रोत्साहन द्यायला हवे, असा खोचक टोला भाजप खासदार रक्षा खडसे यांना लगावला होता.
त्यावर आता लेकीनेही बापाने केलेल्या कामाची जाण ठेवावी, लेक आहे तर लेक आहेच. लेकीने बापाच्या कामाचा विचार करावा आणि लेकीने बापाच्या हद्दीत राहावं, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय.