जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर आणि विशेषतः जुगार व मटका अड्ड्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या कडक सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली आणि जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) नितीन गणापुरे व प्रोबेशनरी DYSP प्रशांत दरेकर यांच्या विशेष पथकाने मंगळवारी (२ जून) शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच दिवशी तब्बल ४ ठिकाणी धडक छापे टाकले. या कारवाईत ८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून ३३ हजार ८४० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे शहरातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मंगळवारी शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष पथकाने समन्वित कारवाई केली. गांधी मार्केट, एमआयडीसी परिसर, आझाद नगर टी-पॉईंट आणि बॉम्बे रेल्वे गेट परिसरातील जुगार अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. या दरम्यान गांधी मार्केट परिसरात कल्याण मटकावर केलेल्या कारवाईत नंदलाल गणपत बुरुजवाले (५६) आणि अशोक गोपाळ महाजन (४९) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून २ हजार ६८० रुपये रोख रक्कम तसेच मटक्याच्या स्लिप, कार्बन आणि पेन जप्त करण्यात आले.

एमआयडीसी हद्दीत सर्वात मोठी कारवाई
सुप्रीम कॉलनीसमोरील टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या वरली मेनबाजार सट्टा अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून चार जणांना रंगेहाथ पकडले. रहीम मेहताब तडवी, निलेश लक्ष्मण सोनार, आशिक शाहा शहादत शाहा आणि दिपक राजेंद्र सोनार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या ठिकाणाहून १५ हजार ७४० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
आझाद नगरमध्ये सट्टा अड्ड्यावर छापा
रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझाद नगर टी-पॉईंट येथे सार्वजनिक ठिकाणी ‘मिलन डे’ सट्टा चालवला जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी दिपक राजाराम रणसिंगे (३८) याला ताब्यात घेत त्याच्याकडून ६ हजार ९९० रुपये आणि सट्ट्याचे साहित्य जप्त केले.
बॉम्बे रेल्वे गेट परिसरातही कारवाई
जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बॉम्बे रेल्वे गेटसमोरील पुलाखाली सुरू असलेल्या ‘मिलन डे ओपन’ सट्टा अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. भरत खेमसिंग गोरखा (३९) याच्याकडून ८ हजार ४३० रुपये रोख रक्कम, पावती बुक आणि पेन जप्त करण्यात आले.
डीवायएसपींच्या पथकाने केलेल्या या दिवसभराच्या धडक मोहिमेत चारही कारवाया मिळून मटका व सट्टा चालवणाऱ्यांकडून एकूण ३३,८४०/- रुपये (तेहतीस हजार आठशे चाळीस रुपये) इतकी रोख रक्कम आणि मोठ्या प्रमाणावर जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. सर्व संशयितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
विशेष पथकाची धडक मोहीम
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि प्रोबेशनरी DYSP प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे यांच्या फिर्यादीवरून गुन्हे नोंदविण्यात आले असून पोलीस कर्मचारी आवेश शेख, प्रणय पवार, अमोल ठाकूर तसेच संबंधित पोलीस ठाण्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला. या धडक मोहिमेमुळे शहरातील अवैध जुगार आणि मटका व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.










