जळगाव लाईव्ह न्यूज । ऐन बकरी ईदच्या दिवशीच चाळीसगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पिराचे बोरखेडा येथील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या शहरातील पाच मित्रांपैकी एका २० वर्षीय वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मोईन जाकीर झारेकरी (वय २०, रा. घाटरोड, चाळीसगाव) असे मृत पावलेल्या तरुणाचं नाव असून सुदैवाने, या दुर्घटनेत त्याचे इतर चार मित्र पोहत बाहेर आल्याने बालंबाल बचावले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण चाळीसगाव परिसरावर शोककळा पसरली असून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

चाळीसगाव येथील नागदरोडवरील पाच तरूण गुरुवारी दुपारी बोरखेडा येथील धरणात पोहण्यासाठी गेले होत. पोहत असतांना त्यातील मोईन झारेकरी हा तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाला. त्याच्या चौघा मित्रांना हा प्रकार समजताच त्यांनी त्याचा शोध घेतला परंतू तो मिळून आला नाही.

घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांसह उपनगराध्यक्ष हर्षल चौधरी, नगरसेवक अनिल ठाकरे, संभाअप्पा जाधव, फकिरा मिर्झा, बाबा ठेकेदार, मुकेश चौधरी आणि रोशन जाधव यांनी तातडीने धरणावर धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तब्बल तीन ते चार तास शोधमोहीम राबवल्यानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मोईनचा गाळात अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला.
मृत मोईन हा हुशार मुलगा होता आणि तो वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेत होता. मुलगा डॉक्टर होऊन घराण्याचे नाव रोशन करेल, अशी आशा त्याच्या माता-पित्यांना होती. मात्र, ईदच्या सणाच्या दिवशीच मोईनचा मृतदेह घरी आल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.










