रावेरमध्ये तरुणीच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार; जबरदस्ती लग्न करून पुण्यात अत्याचार

मे 27, 2026 6:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । रावेर तालुक्यात एका २२ वर्षीय तरुणीचे भरदिवसा अपहरण करून तिला गुंगीचे औषध देत पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यादरम्यान तरुणीसोबत बळजबरीने लग्न लावून त्यानंतर पुण्यात डांबून अत्याचार करण्यात आला असून या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Untitled design 15 jpg webp

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ११ मे रोजी सकाळी रावेर येथील व्ही. एस. नाईक महाविद्यालयाकडे जात असताना मुख्य संशयित आरोपी आदित्य राजू महाजन याने तिला अडवले. बोलण्याच्या बहाण्याने त्याने तरुणीला जबरदस्ती दुचाकीवर बसवून हतणूर परिसरात नेले. तेथे आधीपासूनच कारसह थांबलेल्या काही आरोपींनी तरुणीला गाडीत बसवून पाण्यात गुंगीचे औषध मिसळून दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर अर्धबेशुद्ध अवस्थेत तिला थेट आळंदी येथे नेण्यात आले.

तक्रारीनुसार, तरुणी पूर्ण शुद्धीत नसताना आरोपीने तिच्याशी जबरदस्ती विवाह केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पुण्यातील एका खोलीत तिला ठेवून वारंवार अत्याचार करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींकडून दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

काही दिवस आरोपींच्या तावडीत राहिल्यानंतर पीडित तरुणीने सुटका करून घेत थेट रावेर पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून रावेर पोलिसांनी रसलपूर येथील एकाच कुटुंबातील सदस्यांसह मध्य प्रदेशातील एका व्यक्तीवर आणि अनोळखी मित्रांवर अत्याचार, अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये आदित्य राजू महाजन, राजू महाजन, हरदास महाजन,दिनकर महाजन, गणेश राजू महाजन, रुपेश महाजन, निकिता महाजन (सर्व रा. रसलपूर, ता. रावेर), आदित्यचा मावस भाऊ (शिक्षक, रा. विरोदा, ता. जि. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश), अनोळखी कार ड्रायव्हर, आळंदीत लग्नाला मदत करणारे अनोळखी मित्राचा समावेश असून या प्रकरणातील काही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेमुळे रावेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रावेर पोलीस करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now