Yawal : लग्नाला अवघे काही दिवस बाकी; रोटावेटरमध्ये अडकून तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू!

मे 23, 2026 5:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील दहिगाव येथे आज एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. शेतात रोटावेटरचे काम करत असताना ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून २८ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. योगेश यशवंत पाटील असे या मृत तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे अवघ्या २४ दिवसांवर योगेशचा विवाह ठरलेला असतानाच काळाने त्याच्यावर झडप घातल्याने संपूर्ण दहिगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.

yogesh patil

नेमकी घटना कशी घडली?

दहिगाव येथील रहिवासी असलेला योगेश पाटील हा दुपारी बबलू उर्फ शोभराज रमेश महाजन यांच्या मोहराळे शिवारातील शेतात ट्रॅक्टरने रोटावेटर मारण्याचे काम करत होता. काम सुरू असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली फेकला गेला. त्यानंतर सुरू असलेल्या रोटावेटरमध्ये अडकल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर ट्रॅक्टर सुरू अवस्थेत पुढे जात शेजारील शेतात पोहोचला. परिसरातील एका तरुणाने हा प्रकार पाहताच धाव घेत ट्रॅक्टर बंद केला आणि तातडीने कुटुंबीयांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत योगेशला यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लग्नाच्या घरात पसरला आक्रोश

दरम्यान, मृत योगेशचा विवाह १८ जून रोजी निश्चित झाला होता. कपडे खरेदी, पत्रिका वाटप अशी लग्नाची जय्यत तयारी घरात सुरू होती. ज्या घरात काही दिवसांतच सनई-चौघडे वाजणार होते, तिथे अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातही हळहळ व्यक्त केली जात असून सर्वत्र शोकमय वातावरण आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वसीम तडवी आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. शेतीकाम करताना सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्यास अशा दुर्दैवी घटना घडू शकतात, अशी चर्चा परिसरात होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now