जळगावच्या PWD मध्ये खळबळ ! ५ लाखांची लाच स्वीकारताना शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

मे 9, 2026 4:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२६ । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे सत्र थांबताना दिसत नसून, आज शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली.

lach

एका मक्तेदाराचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी तब्बल १५ लाखांची लाच मागून, तडजोडीअंती ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना शाखा अभियंत्याला ‘एसीबी’च्या पथकाने रंगेहाथ अटक केली. योगेश अहिरे असं लाचखोर अभियंत्याचे नाव असल्याची माहिती आली असून या कारवाईने शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील एका नोंदणीकृत मक्तेदाराने (कंत्राटदार) सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत काम केले होते. या कामाचे त्यांचे लाखो रुपयांचे बिल मंजूर होणे बाकी होते. हे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता योगेश अहिरे यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात अभियंता अहिरे यांनी मक्तेदाराकडे तब्बल १५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.

मक्तेदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) रीतसर तक्रार नोंदवली. ‘एसीबी’च्या पथकाने तक्रारीची अत्यंत गोपनीयतेने पडताळणी केली. पडताळणी दरम्यान लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर, आज शनिवारी दुपारच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या आवारातच पथकाने सापळा रचला. ठरलेल्या तडजोडीनुसार पहिल्या हप्त्याची ५ लाख रुपयांची रोकड स्वीकारताना पथकाने झडप घालून शाखा अभियंता योगेश अहिरे यांना जागीच बेड्या ठोकल्या. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आलीय.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग हा नेहमीच विविध कामांमधील टक्केवारी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत असतो. आज थेट कार्यालयाच्या आवारातच ५ लाखांची लाच स्वीकारताना वर्ग-२ चा मोठा अधिकारी पकडला गेल्याने या विभागातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now