महागाईचा नवा धक्का: इंधनसह गॅस सिलिंडरच्या दरात मोठी दरवाढ होण्याची शक्यता!

मे 1, 2026 10:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । देशातील जनतेला पुन्हा एकदा महागाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आखाती देशांमधील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. याचे थेट पडसाद भारतीय बाजारपेठेवर उमटण्याची चिन्हे असून, लवकरच इंधन आणि घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते.

indhan

पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागणार?

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे तेल कंपन्यांवर मोठा दबाव आहे. परिणामी, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ४ ते ५ रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून स्थिर असलेल्या इंधन दरांमध्ये आता अचानक मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

एलपीजी सिलिंडरवर ५० रुपयांचा बोजा

केवळ पेट्रोल-डिझेलच नाही, तर गृहिणींचे बजेटही कोलमडण्याची शक्यता आहे. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, घरगुती एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतीत ४० ते ५० रुपयांची वाढ होऊ शकते. यामुळे सर्वसामान्यांच्या मासिक खर्चात मोठी भर पडणार आहे.

खरंतर इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर मोठे ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने ‘स्ट्रेट ऑफ होर्मूज’ हा अत्यंत महत्त्वाचा समुद्री मार्ग बंद केला असून, अमेरिकेनेही या मार्गावर नाकेबंदी केली आहे. या दुहेरी संकटामुळे आखाती देशांतून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला असून, याचा सर्वाधिक फटका भारताला बसण्याची चिन्हे आहेत.

जगाला लागणाऱ्या एकूण कच्च्या तेलाच्या आणि एलपीजी गॅसच्या गरजेपैकी २५ टक्के पुरवठा याच मार्गावरून होतो. विशेष म्हणजे, भारताला आवश्यक असणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी ४० टक्के तेल याच मार्गाने येते. मार्ग बंद झाल्यामुळे भारताला मिळणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात तब्बल ६१ टक्के घट झाली आहे. यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत इंधनाचे दर कडाडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now