जळगाव सुवर्णनगरीत सोन्यासह चांदी दरात मोठी घसरण! लग्नसराईत ग्राहकांना मोठा दिलासा

एप्रिल 30, 2026 12:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२६ । गेल्या काही दिवसांपासून गगनला भिडलेल्या सोन्या-चांदीच्या दरांनी आता उतरण घेतली आहे. जळगावच्या सुवर्णबाजारात या आठवड्याच्या सुरुवातीला मोठी घसरण पाहायला मिळाली. गेल्या २४ तासात सोन्याच्या भावात तब्बल २ हजार ३०० रुपयांची कपात झाली, तर चांदी देखील ३ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. मे महिन्यातील लग्नसराईच्या मुहूर्तावर सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी मानली जात आहे.

gold

२८ एप्रिल रोजी सोन्याच्या दरात ६०० रुपयांची घसरण होऊन ते १ लाख ५० हजार ८०० रुपयांवर आले होते. मात्र, २९ एप्रिल रोजी (बुधवारी) पुन्हा मोठी घसरण झाली. एकाच दिवसात २ हजार ३०० रुपये कमी झाल्याने आता सोन्याचा दर १ लाख ४८ हजार ५०० रुपये प्रति तोळा इतका झाला आहे. दोन दिवसांत सोन्याच्या भावात एकूण २,९०० रुपयांची घट झाल्याने बाजारात काहीसा दिलासा मिळाला आहे.

सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही मोठी पडझड सुरू आहे. २८ एप्रिल रोजी चांदी ३ हजार रुपयांनी घसरून २ लाख ४४ हजार रुपयांवर आली होती. बुधवारी पुन्हा त्यात ३ हजार रुपयांची घसरण झाली. या सलग घसरणीमुळे आता चांदी २ लाख ४१ हजार रुपये प्रति किलो या दरावर पोहोचली आहे.

खरेदीदारांची पावले बाजाराकडे
मे महिन्यात लग्नाचे अनेक मुहूर्त असून दागिन्यांच्या खरेदीसाठी अनेक कुटुंबे दरांच्या घसरणीची वाट पाहत होती. आता दोन दिवसांत झालेल्या या मोठ्या घसरणीमुळे जळगावच्या बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम म्हणून हे दर कमी झाल्याचे स्थानिक सराफांकडून सांगण्यात येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now