जळगाव जिल्ह्यात पुन्हा भीषण अपघात ; अमरावतीच्या भावी वधूसह दोघांचा मृत्यू

एप्रिल 29, 2026 8:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, धरणगाव तालुक्यात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पाचोरा तालुक्यातील बांबरुड महादेवाजवळ भीषण अपघात झाला. सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतत असताना चारचाकीचा टायर फुटून झालेल्या अपघातात अमरावतीच्या भावी वधूसह दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मिनाताई मानकर (वय ४२) व भावी वधू शिका बेलसरे (वय २२) या दोघांचा मृत्यू झाला. तर दोघे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

pacd

नेमकी घटना काय?

अमरावती जिल्ह्यातील हरम (ता. अचलपूर) येथील शुभम बेलसरे, सुनील मानकर, शिका बेलसरे आणि मिनाताई सुनील बेलसरे हे ८ मे रोजी होणाऱ्या शिका बेलसरे यांच्या विवाहाची पत्रिका सप्तश्रृंगी मातेच्या चरणी अर्पण करण्यासाठी वणी गड येथे गेले होते. दर्शन घेऊन (२९ एप्रिल) पहाटे ते चारचाकीने गावी परतत असताना सकाळी सुमारे आठ वाजेच्या सुमारास बांबरुड महादेवाजवळ अचानक वाहनाचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून वाहन रस्त्याच्या कडेला घसरले आणि भीषण अपघात झाला.

या अपघातात मिनाताई मानकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर विवाहाच्या उंबरठ्यावर असलेल्या शिका बेलसरे (वय २२) गंभीर जखमी झाल्या. शिका बेलसरे यांना पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जळगावकडे हलवित असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. एकीकडे विवाहसोहळ्याच्या तयारीत रमलेले कुटुंब, सप्तश्रृंगी मातेच्या आशीर्वादासाठी गेले आणि परतीच्या वाटेवर नियतीने घात केला. लग्नाची स्वप्ने डोळ्यांत साठवलेल्या तरुणीचा असा अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now