यंदा पावसाळा कसा राहणार? बुलढाण्यातील भेंडवळ घटमांडणीचा अंदाज जाहीर

एप्रिल 20, 2026 2:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२६ । अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडलेल्या ३७० वर्षांची परंपरा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळ घटमांडणी चे भाकीत आज जाहीर करण्यात आले. यामध्ये शेती, हवामान आणि देशाच्या स्थितीबाबत महत्त्वाचे संकेत देण्यात आले आहेत. या भाकीतानुसार यंदा पावसाचे प्रमाण चांगले असले तरी, महापूर आणि अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून देशाची राजकीय आणि आर्थिक स्थिती देखील अस्थिर राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Bhendwal

भाकीतानुसार, कापूस आणि तांदूळ पिकांचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे, तर ज्वारी, तूर, मुग, उडीद, मटकी, जवस आणि वाटाणा यांसारखी पिके सर्वसाधारण राहतील. तीळ आणि बाजरीचे उत्पादनही भरपूर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

पावसाच्या बाबतीत जून महिन्यात जोरदार पाऊस, जुलैमध्ये सर्वसाधारण पाऊस आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही भागांमध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

देशाच्या एकूण परिस्थितीबाबतही या भाकीतात संकेत देण्यात आले असून, सध्याचे राजकीय नेतृत्व कायम राहील, मात्र तणावपूर्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे. संरक्षण क्षेत्रावर ताण वाढून सीमावर्ती भागात तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच आर्थिक परिस्थिती काहीशी कमकुवत राहण्याचेही भाकीत करण्यात आले आहे.

दरम्यान, भेंडवळ घटमांडणीची परंपरा सुमारे ३७० वर्षे जुनी असून ती आजही कायम आहे. अक्षय तृतीया या शुभ मुहूर्तावर सूर्यास्ताच्या वेळी घटमांडणी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी निरीक्षण करून अंदाज जाहीर केला जातो. या परंपरेला मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि नागरिक उपस्थित राहून प्रतिसाद देतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now