जळगावात कट्टा आणि कोयत्यासह दोन तरुण जेरबंद

एप्रिल 15, 2026 6:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२६ । जळगाव शहरात गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असतानाच, एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा आणि धारदार कोयता घेऊन फिरणाऱ्या दोन तरुणांना फिल्मी स्टाईलने पाठलाग करून बेड्या ठोकल्या. रोहित गोपाळ कुंवर (वय २२, रा. कासमावाडी) आणि सागर रामा सोनवणे (वय २१, रा. आसोदा रोड) असं अटक केलेल्यांचे नाव असून या कारवाईने खळबळ उडाली.

Two youths arrested

दि. १४ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना कासमवाडी परिसरात दोन तरुण शस्त्र घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, त्यांनी तत्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे आणि चंद्रकांत धनके यांना कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी कासमवाडी ते नेरी नाका दरम्यान असलेल्या एकता चौकात सापळा रचला.

फिल्मी स्टाईल पाठलाग

एकता चौकाजवळ संशयास्पद पल्सर दुचाकीवरून येणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांना पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस पथकाने कोणतीही वेळ न घालवता त्यांचा पाठलाग केला आणि काही अंतरावरच त्यांना शिताफीने झडप घालून पकडले.

पोलिसांनी संशयितांची झडती घेतली असता, रोहित कुंवर याच्या कमरेला एक गावठी बनावटीचा कट्टा सापडला, तर सागर सोनवणे याच्याकडे धारदार लोखंडी कोयता आणि कट्ट्याचे रिकामे मॅगझीन आढळून आले. पोलिसांनी ७० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये कट्टा, कोयता आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी समाविष्ट आहे.आरोपींना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार किरण चौधरी व योगेश घुगे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now