जळगाव लाईव्ह न्यूज । गेली सात दशके आपल्या गाण्याने संगीत क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या, आपल्या आवाजाने प्रत्येक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका, सुरांची मलिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी आज जगाचा निरोप घेतला. ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर उद्या दादर शिवाजी पार्कात सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

आशाताईंचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला होता. आशा भोसले यांची गणना बॉलिवूडच्या दिग्गज गायकांमध्ये केली जाते. आजवर त्यांनी २० हून अधिक भाषांमध्ये १२,००० हून अधिक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. संगीताच्या इतिहासात सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करण्याचा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ देखील आशा यांच्या नावावर आहे. त्यांच्या जाण्याने संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून, ही भरून न निघणारी हानी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या आठवणी आणि गाणी मात्र कायम रसिकांच्या मनात जिवंत राहतील.












