चोरट्यांनी हद्दच केली ! थेट ATM मशीनच पळविले, लाखोंची ऐवज चोरीस ; जळगावात खळबळ

एप्रिल 3, 2026 5:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटना वाढत असतानाच आता चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच उचलून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत सुमारे साडेनऊ लाख रुपयाचा ऐवज चोरीस गेला आहे. ही घटना शहरातील पोलन पेठ परिसरात घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे

atmchori

याबाबत इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे ब्रांच मॅनेजर हरिष विजय गांधी (वय ३७) यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलन पेठ येथील सत्यम प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर बँकेची शाखा व संलग्न एटीएम केंद्र आहे. गुड फ्रायडेच्या सुट्टीमुळे एटीएममध्ये मोठ्या प्रमाणात रोकड ठेवण्यात आली होती. याच संधीचा फायदा घेत चार अज्ञात इसमांनी पहाटे १ ते १.३० च्या सुमारास एटीएममध्ये प्रवेश करून मशीनला जाड दोर बांधून वाहनाच्या सहाय्याने खाली पाडले. त्यानंतर काही मिनिटांतच मशीन चारचाकी वाहनात टाकून तेथून पलायन केले.

घटनेनंतर एटीएम केंद्रातील काचा फुटलेल्या अवस्थेत आढळून आल्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली असून त्यात चार संशयित दिसून येत आहेत. या चोरीत सुमारे २ लाख ५० हजार रुपये किमतीचे एटीएम मशीन व त्यामध्ये असलेली अंदाजे ७ लाख रुपयांची रोकड असा एकूण ९ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जळगाव शहर पोलीस करीत आहेत. चोरट्यांच्या शोधार्थ पथके रवाना झाली आहेत. मात्र या घडलेल्या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now