जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२६ । मार्च महिना संपला आता अवघे काहीच दिवस उरले आहेत. मात्र अद्यापही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याच्या हप्तेचे 1500 रुपये मिळालेले नाहीय. यामुळे लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत. फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं आहे. अशातच लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने २७७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, ही रक्कम महिला व बालविकास विभागाच्या निधी वितरण प्रणालीवर वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात लवकरच १५०० रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.

जानेवारी महिन्याचा हप्ता २३ फेब्रुवारीला वितरित करण्यात आला होता. आता फेब्रुवारीचा हप्ता लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ई-केवायसी करताना काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्याचे समोर आले होते. त्यामुळे अशा महिलांना ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता फक्त ६ दिवस शिल्लक आहेत. ज्यांनी अद्याप दुरुस्ती केलेली नाही, त्यांनी तातडीने मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून दुरुस्ती पूर्ण करावी, अन्यथा लाभ बंद होऊ शकतो.
ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक महिलांनी प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे. ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप ई-केवायसी दुरुस्त केलेली नाही, त्यांनी ३१ मार्चपर्यंत ती नक्की पूर्ण करा, जेणेकरून फेब्रुवारीचा हप्ता आणि पुढील सर्व हप्ते नियमित मिळू शकतील.












