महाराष्ट्रात IMD कडून पावसासह गारपिटीचा मोठा इशारा ; आज या ९ जिल्ह्यांना अलर्ट जारी, जळगावात काय स्थिती?

मार्च 16, 2026 10:44 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२६ । महाराष्ट्रात एकीकडे उन्हाचा कडाका वाढला असताना हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळेल मात्र शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

Rain

जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाचा चटका बसत आहे. गेल्या आठवड्यात कमाल तापमानाने चाळीशी ओलांडली होती. यामुळे उन्हाचा चटका वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. अशातच 20 मार्च 2026 पर्यंत राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. पावसासोबतच विजांचा कडकडाट आणि वादळी वारेही असेल. त्याअनुषंगाने हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.

मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज भारतीय हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला. मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस हजेरी लावत आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, जालना या भागात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. कोल्हापूर आणि साताऱ्यात गारपिटीसह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

जळगावातही पावसाचा अंदाज?
दरम्यान गेल्या २४ तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर गेल्या दोन दिवसात जळगावातील पारा घसरला असून रविवारी ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रात्रीच्या पारादेखील वाढला आहे. रविवारी जळगावचे किमान तापमान २५ अंशावर पोहोचले आहे. दरम्यान, हवामान खात्यानं जळगाव जिल्ह्यात १७ मार्चपासून पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यादरम्यान विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता असून नागरिकांसह शेतकऱ्यांना खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now