जळगाव लाईव्ह न्यूज । चोरट्या वाळू वाहतुकीविरोधात जळगाव जिल्हा पोलीस दलाने धरणगाव तालुक्यातील बांभोरी, टाकरखेडा, खेडी व परिसरात पहाटे मोठी संयुक्त कारवाई करत अवैध वाहतुकीला जबर दणका दिला. या मोहिमेत ३२ ट्रॅक्टर, ८ डंपर जप्त करण्यात आले आहे. जप्त वाहने पोलिस मुख्यालय परिसरात लावण्यात आली आहेत.

जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांनी धुमाकूळ घातला असून अनेकवेळा कारवाईसाठी जाणाऱ्या महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यावर हल्ले करण्यात आल्याच्या घटना दिसून आल्या आहे. दरम्यान, गिरणा व तापी नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असतो. या वाळू उपशाला आळा बसावा म्हणून पोलिस प्रशासन, महसूल विभाग व प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने कारवाई हाती घेण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी पहाटे पाच वाजताच पोलिस पथक बांभोरी गावात पोहोचले व कारवाई सुरू केली.

या धाडीसाठी सुमारे दीडशे ते दोनशे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला होता. नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आलेल्या या कारवाईमुळे वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
जप्त ३९ वाहने पोलिस कवायत मैदानावर आणून उभी केली. यातील बऱ्याच वाहनांना नंबरप्लेट नाहीत. काही वाहनांची परवानगी मुदत संपली, कागदपत्रेच उपलब्ध नाहीत. या वाहनांच्या व्हेरिफिकेशनसाठी पोलिसांनी आरटीओ विभागाच्या दोन पथकांना पाचारण केले असून, प्रत्येक वाहनाची तांत्रिक तपासणी आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.
दरम्यान, या कारवाईपूर्वी एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्या विरोधात विधिमंडळात तारांकित प्रश्न दिला होता. यावर उत्तर देण्यासाठी महसूल विभागाने जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून कारवाईचा अहवाल मागवला होता. त्यामुळे ही कारवाई वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी आहे की विधिमंडळात उत्तर देण्यासाठी केलेली तयारी आहे, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.












