जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात केळी पीक विम्याच्या नावाखाली एक मोठे रॅकेट सक्रिय झाले आहे. काही दिवसापूर्वी जिल्ह्यात केळी पीक विम्याच्या नावाखाली हजारो हेक्टरवर बोगस विमा उतरवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. यानंतर आता विमा प्रतिनिधींकडून विमा मंजूर करून देण्याच्या नावाखाली प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांची शेतक-यांकडून अवैध वसुली केली जात असल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

एका दैनिकांत छापून आलेल्या वृत्तानुसार हा प्रकार जिल्ह्यातील ६० ते ७० महसूल मंडळांमधील ३०० हून अधिक गावांमध्ये सुरू असल्याचे शेतकऱ्यांकडून नमूद करण्यात आले आहे. एका गावातून सरासरी ३० ते ५० शेतकऱ्यांकडून ५ हजार रुपये वसूल केले जात असल्यामुळे एका गावातून १.५ ते २ लाख रुपयांपर्यंतची अवैध रक्कम जमा होते. काही ठिकाणी प्रत्यक्ष केळी लागवड नसतानाही विमा प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या नावे बोगस विमा उतरवला असल्याचा आरोप आहे.

विमा कंपनीकडे आधीच माहिती असते की कोणते महसूल मंडळ पात्र ठरणार आहे. त्यामुळे विमा प्रतिनिधी पात्र मंडळातील शेतकऱ्यांकडून पैसे मागून गंड घालतात. काही शेतकऱ्यांना भितीदेखील दाखवली जाते की मंडळ पात्र होणार नाही; मात्र पैसे दिल्यास पात्र होईल, असे आश्वासन दिले जाते.
पूर्वी प्रति हेक्टर २-३ हजार रुपये वसूल केले जात होते; आता हा दर ५ हजार रुपये पर्यंत पोहोचला आहे. शेतकऱ्यांचा विश्वास आहे की “मंडळ पात्र होणारच”, त्यामुळे ते पैसे देत आहेत. दरम्यान, कृषी आयुक्तालयाने बोगस विमा नोंदी करणाऱ्या शेतकऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, शेतकऱ्यांना या जाळ्यात ओढणारे, त्यांच्याकडून पैसे उकळणारे आणि बोगस नोंदी करणारे विमा प्रतिनिधी व कंपन्यांचे अधिकारी यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. केवळ शेतकऱ्यांवरच कारवाई का ? या रॅकेटची सखोल चौकशी का होत नाही? असा प्रश्न आता केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.







