जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावातून खुनाची धक्कादायक घटना समोर आलीय. सिगारेट पिताना झालेल्या किरकोळ वादातून आणि शिवीगाळीच्या रागातून लाँड्री व्यावसायिकाच्या डोक्यात दगड टाकून खून करण्यात आल्याची घटना जळगाव शहरातील खंडेराव नगरात रेल्वे रुळाच्या बाजूला घडली. अमर वसंत सपकाळे (४२, रा.खंडेराव नगर) असं खून झालेल्या तरुणाचं नाव असून या प्रकरणात रामानंद नगर पोलिसांनी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यात इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

लाँड्री व्यावसायिक करणारे अमर सपकाळे हे १३ फेब्रुवारी रोजी रात्री घरातून गेले होते. त्यानंतर १५ रोजी सकाळी रेल्वे रुळाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला ही घटना रेल्वे अपघाताचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, रामानंदनगर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी एका अल्पवयीन संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संशयित आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री संशयित दोन आरोपी रेल्वे रुळाजवळ सिगारेट पीत बसले होते. त्याच वेळी अमर सपकाळे तिथे आले. ते दारूच्या नशेत होते. नशेत असलेल्या सपकाळे यांनी आरोपींना काही कारणावरून शिवीगाळ केली. याच रागातून आरोपींनी सपकाळे यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांची हत्या केली.
या प्रकरणात एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले असले तरी, त्याचा दुसरा साथीदार अद्याप फरार आहे. रामानंदनगर पोलीस पथक या दुसऱ्या संशयित आरोपीचा शोध घेत आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान संशयित आरोपीमध्ये इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे.











