जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२६ । जागतिक बाजारपेठेतील प्रचंड अस्थिरता आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला ओढा यामुळे भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदी दरात ऐतिहासिक उसळी पाहायला मिळाली.

गुरुवारी चांदीच्या दराने पहिल्यांदाच 4 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला असून सोन्याचे दरही उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. असं असताना सोने आणि चांदीच्या किमती बाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दोन दिवस आधी सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. आज देशभरात 24 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम सुमारे 8,230 रुपयांनी तर 22 कॅरेट सोनं सुमारे 7,550 रुपयांनी स्वस्त झाल आहे. दुसरीकडे चांदी दरात तब्बल 15000 रुपयाची घसरण झाली.
Goodreturns च्या आकडेवारीनुसार, आज सकाळच्या सत्रात जळगावच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,230 रुपयांनी कमी होऊन प्रति 10 ग्रॅम 1,70,620 रुपये झाला आहे. तर 22 कॅरेटचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,56,400 रुपये इतका आहे. सोन्यासोबतच चांदीचा दर देखील घसरला आहे. आज चांदीचा दर 15000 हजार रुपयांनी घसरून 3,95,000 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. यापूर्वी काल चांदी दराने तब्बल 4 लाखांचा टप्पा ओलांडून नवा इतिहास रचला होता.
दरवाढीची मुख्य कारणे
रशिया-युक्रेन आणि मध्य पूर्वेतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे ओढा वाढला आहे. रुपयाचे मूल्य घसरल्याने आणि डॉलरमधील अस्थिरतेमुळे देशांतर्गत किमती वाढल्या आहेत. सौर ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात चांदीची टंचाई भासत असल्याने किमती भडकल्या आहेत.












