जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२६ । राज्यात एकीकडे महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना यांनतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवला जात होता. पण आता या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण, त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे.

खरंतर सर्वेाच्च न्यायालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ या पूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. मात्र, दिलेली मर्यादा ओलांडून त्यानंतर काही दिवसांत झेडपीच्या निवडणुका होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. अशातच आता या प्रकरणी एक याचिका सर्वाेच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. दाखल केलेल्या याचिकेबाबत उद्या सोमवारी सुनावणी होणार आहे.

50 टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात येत असल्याचे समोर आले होते. त्यातच आता सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल झाली आहे. त्यामुळे निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील ३२ जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्यात याव्यात, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.












