जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव महापालिकेत महायुतीच्या आणखी एका उमेदवाराची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे यांच्यानंतर आता शिवसेनेचे उमेदवार तथा आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र डॉ. गौरव सोनवणे यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी तब्बल १०३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. पैकी १३५ अर्ज छाननीच्या प्रक्रियेत बाद ठरले असून, उर्वरित ९०३ अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान, प्रभाग १२ (ब) मधून उज्वला बेंडाळे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्या विरोधात छाननीत दोघंही उमेदवारी अर्ज बाद झाल्याने उज्वला बेंडाळे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्यामुळे निवड बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या पाठोपाठ महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेही महापालिकेत धमाकेदार एंट्री केली आहे. प्रभाग क्रमांक 18-अ मधून गौरव चंद्रकांत सोनवणे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
आजपासून अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्याच दिवशी मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. अर्थात, या माध्यमातून महापालिकेत शिवसेनेने देखील खाते उघडले असून महायुतीचा दुसरा उमेदवार बिनविरोध झाला आहे.











