जळगाव लाईव्ह न्यूज । मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात जळगाव ते भुसावळ दरम्यान चार रेल्वे मार्गावरून प्रवासी गाड्या धावत असून पाचव्या मार्गाचे काम करतानाच जळगाव रेल्वे यार्डात सहाव्या मार्गाचे काम त्यामुळे हाती घेतले जाणार आहे. जालना मार्गासाठी जळगाव-भादलीदरम्यान अंदाजे नऊ किलोमीटर लांबीचा सहावा मार्ग उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक जमिनीचे सपाटीकरण सुरू करण्यात आले आहे.

जळगाव-भुसावळ स्थानकांदरम्यान यापूर्वी चार रेल्वे मार्गांचे काम पूर्ण करण्यात आले असून, त्यावरून प्रवासी व मालवाहतूक गाड्या दररोज धावत आहेत. त्यानंतर आता जळगाव-भादली स्थानकांदरम्यान नऊ किलोमीटर लांबीच्या पाचव्या रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी अंदाजे ११३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पाचव्या रेल्वे मार्गाचे काम करताना लेंडी नाल्यापासून जळगाव स्थानकापर्यंतच्या यार्डात सहावा मार्ग सुद्धा टाकण्यात येणार आहे.

त्यादृष्टीने कंत्राटदाराने शिवाजीनगर पुलापासून लेंडी नालापर्यंतच्या भागाचे डाऊन दिशेला तहसील कार्यालयाच्या बाजुने जमीन सपाटीकरण पूर्ण केले आहे. लवकरच या ठिकाणी पाचवा आणि सहावा रेल्वे मार्ग एकाच वेळी टाकण्यात येणार आहे. दोन्ही मार्ग टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर जळगाव स्थानकावर प्रस्तावित असलेल्या नवीन फलाटावर अप दिशेला जाणाऱ्या गाड्या थांबवणे शक्य होईल, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान जळगाव-जालना या एकूण १७४ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गापैकी ३४ किलोमीटरचा भाग जळगाव जिल्ह्यातून असणार आहे. या मार्गासाठी आवश्यक जमिनींच्या संपादनाची प्रक्रिया प्रशासनाकडून सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. जळगाव-भुसावळ रेल्वेमार्गावरील भादली स्थानकापासून नवीन जालना मार्ग वळविण्यात येणार असल्याने त्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्राथमिक कामाला सुरूवात केली आहे.











