जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात डोळ्यात मिरची पावडर टाकून ८ लाखांची रोकड लांबविल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. याप्रकरणात दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळत त्यांच्याकडून संपूर्ण ८ लाखांची रोकड हस्तगत केली. विजय शांताराम पाटील (वय ४१ वर्षे, रा. कलावसंत नगर, जळगाव) आणि जितेंद्र छोटुलाल जाधव (वय ४४ वर्षे, रा. ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड, जळगाव) असं अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.

जळगाव येथील जुनी जोशी कॉलनी परिसरात राहणारे फिर्यादी विलास मधुकर जाधव (वय ६७) यांनी १५ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम अज्ञात आरोपींनी हिसकावून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हा गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, राहुल गायकवाड यांनी अधिकारी आणि अंमलदारांचे विशेष तपास पथक तयार केले. या पथकाने २३ नोव्हेंबर २०२५ रोजी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे विजय पाटील आणि जितेंद्र जाधव या दोघांना अटक करत त्यांच्याकडून संपूर्ण ८ लाखांची रोकड हस्तगत केली. रोख रक्कम आणि आरोपींना पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास आता एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.











