जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२५ । मागच्या काही दिवसापासून हुडहुडी थंडीचा अनुभव घेत असलेल्या जळगावकरांना आता उकाड्याचा सामना करावा लागत आहे. कारण उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे आणि चक्रीवादळामुळे जळगावसह राज्यातील तापमानात वाढ होऊन थंडी गायब झाली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत रात्रीच्या तापमानात तब्बल ६ ते ७ अंशांची वाढ नोंदवली गेली आहे.

तापमानाच्या नोंदीनुसार, जळगाव शहराच्या रात्रीच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी जळगाव शहरातील रात्रीचे तापमान ९ अंशांवर होते. तर, २४ नोव्हेंबर रोजी हेच तापमान १६ अंशांपर्यंत वाढले होते. केवळ चार दिवसांत रात्रीच्या तापमानात ७ अंशांची वाढ झाली आहे. यासोबतच दिवसाच्या तापमानातही २ अंशांची वाढ होऊन पारा ३१ अंशांवर पोहोचला आहे.

मागच्या काही दिवसापासून उत्तरेकडून येणाऱ्या थंडी वाऱ्यांमुळे तापमानात मोठी घट होऊन जळगावात थंडीचा कडाका वाढला होता. गेल्या आठवड्यात १८ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे २३ वर्षापूर्वीचा विक्रम मोडत पारा थेट ७.१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला होता. तापमानात घट झाल्याने जळगाव थंडीने गाठरला होता. दिवसादेखील घरात स्वेटर घालावे लागत होते. मात्र मागच्या चार दिवसापासून तापमानात वाढ होऊन थंडी गायब झालीय. ढगाळ वातावरणामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे पूर्णपणे अडविले गेले असल्यामुळे थंडीच्या प्रमाणात घट होऊन, तापमानात वाढ झाली आहे.
थंडीचे पुनरागमन कधी?
ही बदललेली स्थिती २६ ते २७नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात कायम राहण्याची शक्यता आहे. जळगावकरांना दोन दिवसांपासून होत असलेल्या उकाड्यापासून लवकरच दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात थंडीचे पुन्हा आगमन होण्याची शक्यता आहे.










