जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२५ । ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या 89 व्या निधन झालं आहे. मागच्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज (24 नोव्हेंबर) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपल्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानं अख्खं बॉलिवूड शोकसागरात बुडालं आहे. दरम्यान अद्याप देओल कुटुंबीयांनी धर्मेंद्र यांच्या मृत्यूबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आलेत.

पंजाबमधील लुधियाना इथल्या एका गावात धर्मेंदर केवल कृष्ण देओल यांचा जन्म झाला होता. त्यांनी 1954 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतत प्रवेश केला. नंतर विवाहित असतानाच धर्मेंद्र हे अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं.धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘सत्यकाम’, ‘सीता और गीता’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केलं.







