जळगावच्या तापमानाने मोडला २३ वर्षापूर्वीचा विक्रम; पारा 7 अंशांवर, थंडी आणखी वाढणार

नोव्हेंबर 19, 2025 10:50 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२५ । महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असून जळगाव शहराच्या तापमानाने १८ नोव्हेंबर रोजी पहाटे २३ वर्षापूर्वीचा विक्रम मोडला असून, पारा थेट ७.१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. भारतीय हवामान खाते आणि ममुराबाद वेधशाळेकडे या विक्रमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान हवामान विभागाने अजून दोन तीन दिवसांपर्यंत थंडीची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

cold weather

जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढल्याने रात्री व पहाटे हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत आहे. खरंतर जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात रात्रीच्या तापमानाची सरासरी १४ ते १५ अंश सेल्सिअस इतकी असते. मात्र, यंदा हीच सरासरी ९ ते १० अंशांवर आली आहे. याचा अर्थ, सरासरीपेक्षा यंदा तापमानाचा पारा तब्बल ४ अंशांनी कमी झाला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून तापमानात मोठी घट होत असून, नोव्हेंबर महिन्यातच थंडीचा एवढा कहर असताना डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात हा थंडीचा जोर अजून वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जळगावच्या तापमानाने काल मंगळवारी (१८ नोव्हेंबर) २३ वर्षापूर्वीचा विक्रम मोडला आहे. काल जळगावचा पारा ७.१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. यापूर्वी, २००२ मध्ये नोव्हेंबर महिन्यात रात्रीचे तापमान ७.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते. दरम्यान, रात्रीच्या तापमानासोबतच २ दिवसाच्या तापमानातही घट झाली असून, मंगळवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी दिवसाचे तापमान २८ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले.

सध्या जिल्ह्यात सर्वदूर तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. हवामान विभागाकडून जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. सध्याचा थंडीचा हा जोर बघता, डिसेंबर-जानेवारीसाठी नागरिकांनी अधिक तयारी करण्याची आवश्यकता आहे. थंडी आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now