जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२५ । थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या जळगावकरांना आता हुडहुडी भरणारी थंडी जाणवू लावली आहे. उत्तरेकडून शीत वाऱ्याचे प्रवाह येत असल्याने परिणामी जळगावातील तापमानात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. शनिवारी धुळ्यानंतर जळगावमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. जळगावला काल शनिवारी १०.८ अंश तापमान होते. यामुळे जळगाव गारठले असून आगामी दिवसात गारठा आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.

उत्तरेकडील थंड वारे मध्य भारत तसेच महाराष्ट्राकडे वाहून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील किमान तापमान अचानक घटून थंडीला सुरुवात झाली. कमाल तापमानात हळूहळू घट होत आहे. शनिवारी राज्यातील अनेक जिल्ह्यातील कमाल आणि किमान तापमानात घसरण नोंदवले गेले. काल राज्यात धुळे येथे नीच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. त्याठिकाणी १०.४ अंश तापमान होते. त्यांनतर जळगावचे किमान १०.८ अंश तापमान होते. ते सरासरीपेक्षा पाच अंशाने खाली आहे.

दरम्यान येणारा आठवडा राज्यात थंडीचा असेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. आज रविवारपासून धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, संभाजीनगर व उत्तर अहिल्यानगर अशा सहा जिल्ह्यांत सरासरीपेक्षा २ ते ४ अंशाने तर विदर्भात २ अंशाने किमान तापमान खालावू शकते, असा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.
राज्यात गारठा वाढण्याचे कारण
प. हिमालयातील नवीन बर्फवृष्टीनंतर दिल्लीत वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे आणि रात्रीच्या निरभ्र आकाशामुळे रेडिएशनल कूलिंगमध्ये वाढ झाली. उत्तरेकडील थंड वारे मध्य भारत आणि महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. ईशान्य बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण कर्नाटकात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.










